सिखांचा धर्म ग्रंथ श्री गुरु ग्रंथ साहिबजी हा जगातील असा एकमेव ग्रंथ आहे की ज्यास 'गुरुपद' प्राप्त झाले आहे. सिख बांधव ह्या ग्रंथास देहधारी गुरु मानतात.
मराठी माणसाला सिख माणूस माहित आहे. त्यांची उद्दमशीलता माहित आहे. त्यांनी गाजवलेले शोर्य माहीत आहे. आजही भारतीय सैन्य दलात सिख बांधव बजावत असलेली महत्वाची कामगिरी माहित आहे. देश, धर्म आणि भारतीय संस्कृतीच्या रक्षणा करता सिख गुरूंनी, त्यांच्या पुत्रांनी केलेले अत्युच्य बलिदानाबद्दल सर्व भारतीयांचा माथा त्यांच्यापुढे आदराने विनम्र होतो. पण हे सर्व करणाऱ्या सिख बांधवांचा मनोपिंड ज्यावर पोसला जातो त्या त्यांच्या धर्मग्रंधाबद्दल 'श्री गुरु ग्रंथ साहिबजी' बद्दल मात्र मराठी माणसाला फारच कमी माहिती आहे. ती माहिती व्हावी हा या भावानुवादाचा उद्देश आहे.
आजपर्यंत निर्मित झालेल्या सर्व धार्मिक ग्रंथांमध्ये फक्त ज्या धर्माचा तो ग्रंथ आहे, त्याच समाजाचे व साधुसंतांचे विचार त्यात मांडलेले असतात. परंतु जगाच्या पाठीवर हा एकमेव "श्री गुरु ग्रंथ साहिबजी" आहे जो धर्म, सर्व जाती, सर्व वर्ण व संप्रदायांच्या संतांना आपल्याबरोबर घेऊन मानव धर्माचा प्रचार करीत आहे. म्हणूनच हा गुरुग्रंथ केवळ सिख धर्मातील लोकांचा ठेवा नसून जगातील सर्वं मानव धर्माचा श्री गुरु ग्रंथ साहिब जी आहे.
सिख बांधवांचे दहावे गुरु श्री गुरु गोबिंद सिंह साहिब जी यांनी आपल्या परलोक गमनापूर्वी जवळच्या सर्व सिख बंधूना एकत्र केले व आपला अंतकाळ जवळ आल्याचे सांगून त्यांना दिलासा देऊन श्री आदि ग्रंथ साहिब पुढे ठेऊन म्हणाले,
"आज्ञा भई अकालकी तभै चलाऊ पंथ सभ सिखन को हुकम है गुरु मान्यो ग्रंथ "
त्यानंतर त्यांनी श्री आदि ग्रंथ साहिबची गुरुगद्दीवर स्थापना केली. ग्रंथापुढे पाच पैसे व श्रीफळ ठेवून त्यास प्रदिक्षणा घातली व म्हणाले,
"आगिआ भइ अकाल की तबे चलायो पंथ !
सब सिखनको हुकूम है गुरु मानिओ ग्रंथ !!"
त्या क्षणापासून देहधारी गुरुंची परंपरा खंडित झाली व श्री आदिग्रंथास गुरु पद प्राप्त झाले व त्यास "श्री गुरु ग्रंथ साहिब जी" हे नामाभिधान प्राप्त झाले.
श्री गुरु ग्रंथ साहिब हा १४३० पानांचा बृहत ग्रंथ असून त्यात ५८९४ पदे आहेत. श्री गुरु ग्रंथ साहिब मधील पदांना 'शबद' किंवा 'बाणी' असे म्हणतात. तसेच पानांना 'अंग' असे म्हणतात. कारण सिख बांधव श्री गुरु ग्रंथ साहिब यांस देहधारी गुरु मानतात व त्यांच्या पानांना, देहाचे अवयव, म्हणून अंग असे संबोधतात.
श्री गुरुग्रंथ साहिबजी मध्ये अंकित गुरुची वाणी
श्रीगुरु नानकदेव जी, श्रीगुरु अंगददेव जी, श्रीगुरु अमरदास साहिब जी, श्रीगुरु रामदास साहिब जी, गुरु अर्जुन देव जी, श्रीगुरु तेगबहादुर साहिब जी
श्री गुरुग्रंथ साहिबजी मध्ये अंकित भक्तांची वाणी
भक्त नामदेवजी, भक्त त्रिलोचनजी, भक्त जैदेवजी, भक्त रामानंदजी, भक्त कबीरजी, भक्त सेनजीनावी, भक्त रविदासजी, भक्त भीखनजी, भक्त परमानंदजी, भक्त बेनीजी, भक्त पिपाजी, भक्त सूरदासजी, भक्त साधनाजी, भक्त फरिदजी, भक्त धन्नाजी, भाई सुंदरजी, भाई मरदानाजी, भाई सात्ताजी, भाई बालवयंतजी आणि ११ भटांची वाणी.
श्री गुरु ग्रंथ साहिबजी चा मराठी अनुवाद
श्री गुरु ग्रंथ साहिबजी हा एक अमोलिक ग्रंथराज असून तो बारावी शताब्दी ते सोळाव्या शताब्दी पर्यंतच्या भारतातील भक्ती विचारांचा महाकोश आहे. त्यामुळे तो भारतीय सांस्कृतीच्या एकात्मकतेचा प्रतीक आहे. पण असे असूनही तो गुरुमुखी लिपीत लिहिला गेला असल्याने ती लीपी जाणण्याऱ्याशिवाय तो अन्य कोणासही माहित नाही. त्यामुळे त्यातील प्रेरणादायी विचारही इतर भारतीय जनतेस माहित नाहीत. ह्यापूर्वी श्री गुरु ग्रंथ साहिब चा अनुवाद फक्त हिंदीतच झाला आहे. तरीही भारतातील इतर भगिनी व त्यांचा वापर करणारे भारतीय बांधव श्री गुरु ग्रंथ साहिबच्या दिव्य संदेशास अद्यापही वंचित राहिलेले आहेत.
सिख व मराठी बांधव यांच्यातील सांस्कृतिक बंध हे दृढ व्हावेत. ह्यासाठी श्री गुरु ग्रंथ साहिबचा मराठी अनुवाद होणे जरुरीचे आहे असे आम्हास वाटले म्हणून आम्ही त्या प्रयत्ननास लागलो. हे काम एकट्या दुकट्याचे नाही. हि सामूहिक जबाबदारी आहे. म्हणून आम्ही 'सिख धर्म प्रचार कामिटी' हा सार्वजनिक विश्वस्त न्यास स्थापन करून तो धर्मादाय आयुक्त यांच्या कार्यालयातून नोंदणी करून घेतला.
सिख धर्म प्रचारक कमिटीचे दोघे विश्वस्त श्री विनायकराव लिमये, व स. तारासिंघ गोरोवाडा ह्यांनी ही जबाबदारी स्वीकारली व हे काम पूर्ण केले. त्याबद्दल सिख धर्म प्रचार कमिटी त्यांचे ऋणी आहे.
श्री गुरु ग्रंथ साहिब हा ग्रंथ १४३० पृष्ठाचा आहे. त्याचे देवनागरी लिप्यांतर, पंजाबी शब्दांचे मराठी अर्थ व मराठी भावार्थ ह्यामुळे मराठी अनुवादाची सुमारे ४००० पाने झाली. त्याशिवाय मराठी माणसास अधिक माहिती व्हावी म्हणून आम्ही पांजाबी भाषेची, श्री गुरु ग्रंथ परिचय, श्री गुरु ग्रंथ साहिबमध्ये ज्यांची वाणी अंकित केली गेले आहे. हे सर्व वाङमय सात खंडात प्रसिद्ध करत आहोत.
वाचक हो,
श्री गुरु ग्रंथ साहिबजी हा ग्रंथ पंजाबी भाषेत व गुरुमुखी लिपीत लिहेलेला आहे. मराठी वाचकास गुरुमुखी लिपीचे ज्ञान नसल्याने मूळ ग्रंथ वाचता येत नाही म्हणून आम्ही तो देवनागरी लिपीत लिप्यांतर करून छापला आहे. त्यामुळे मराठी वाचकांस तो वाचणे सुलभ होईल असे वाटते.
पंजाबी भाषेत बहुतांशी शब्द मूळ संस्कृत भाषेतून आले आहेत. त्यामुळे ते मराठी वाचकास समजणे सोपे जातील. काही शब्द फारशी आहेत. ते संदर्भावरुन समजू शकतात. काही अवघड पंजाबी शब्दांचे अर्थ आम्ही पदाच्या खाली दिले आहेत
भारतातील महत्वाच्या पाच गुरुद्वारांच्या कोशगृहात वाचकांना मराठी भाषेतील हा खंड उपलब्ध करून दिलेला आहे. आपणासही विनंतीवरुन खंड उपलब्ध करुन देण्यात येईल.
अनुवादक
श्री विनायक नारायण लिमये

जन्म: १० आक्टोबर १९२६ - मृत्यू : २२ मार्च २०१०
शिक्षण: B.Sc. Agri.
श्री विनायकराव लिमये त्यांचा जन्म रत्नागिरी येथे एका सुशिक्षित कुटुंबात झाला. त्यांनी त्यांच्या आईवडिलांकडून परोपकारी वृत्ती व सामाजिक भान यांचा वारसा लाभला होता. शालेय जीवनापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले होते. १९५२-५३ अशी दोन वर्षे आसाम मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवकांचे प्रचारक म्हणून पूर्ण वेळ काम केले. त्यानंतर ते विवाह करून सरकारी नौकरीत रुजू झाले. त्यांनी बरीच वर्षे महाराष्ट्र आणि गोवा या दोन प्रांताची विवेकानंद केंद्राचे संघटक म्हणून जबाबदारी सांभाळली. प्रचंड वाचन, अभ्यासू व सामाजिक कार्याची आवड, त्यामुळे ते विविध सामाजिक संस्थांशी जोडलेले होते व विविध सामाजिक उपक्रम राबवत होते.
सेवा निवृत्तीनंतर काही वर्षे पारगाव (जिल्हा सोलापूर) येथे स्वतःच्या शेतातील घरी आश्रमखाना चालविला. अनाथ व गरजू मुलांना शालेय तसेच व्यावसायिक शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्याचा उद्देश या मागे होता. वाढते वय व प्रकृतीच्या कारणामुळे आश्रम बंद करून पुणे येथे परतावे लागले. परंतु वाढते वय व अपघाताने आलेले अधूत्व व डोळ्याला आलेल्या अंधत्व याची पर्वा न करता ते सतत कार्यक्षम राहिले. पुणे येथे सुखसागर नगर येथे स्वतःच्या वास्तूत वास्तव्यास आल्यावर तेथिल शालेय व महाविद्यालयीन विध्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले. त्यांनी आपल्या सांस्कृतिक मंडळाचा एक उपक्रम म्हणून स. प. महाविद्यालय येथे "सर्व धर्म सामादर परिषद" चे आयोजन केले. हे आयोजन करताना त्यांनी विविध धर्माच्या ग्रंथांचे वाचन करून हे विविध धर्म समजावून घेण्याचा प्रयत्न केला.
जेव्हा सिख धर्माचे "श्री गुरु ग्रंथ साहिबजी" या धर्मग्रंथांचे मराठी भाषांतर झालेच नसल्याचे त्याच्या लक्षात आले. या परिषदेच्या निमित्ताने सिख धर्माचे विचार मांडण्यासाठी आलेले जेष्ठ अभ्यासक सरदार तारासिंग गोरोवाडा यांच्याशी परिचय झाला. या दोघांनी मिळून "श्री गुरु ग्रंथ साहिबजी" या धर्मग्रंथाचे मराठी भावानुवाद करण्याचे ठरविले. त्या वेळी विनायक लिमये यांचे वय ७७ वर्ष होते. पण त्याही वयात हे शिवधनुष्य त्यांनी पेलण्याचे ठरविले. पहाटे लवकर उठून ते लिखाणास सुरवात करुन दिवस-दिवस लिखाण करत असत. १००० पानांच्या या धर्मग्रंथाचा मराठीतील भावानुवाद झाला. सुमारे ५००० पानांचा ७ ते ८ वर्षे सातत्याने रात्रंदिवस बसून, त्यांनी मराठीतील सात खंडात या भावानुवादाचे काम पूर्ण केले. शेवटच्या सातव्या खंडाचे लिखाण पूर्ण झाल्यावर तो प्रकाशित होण्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण हे मोठे कार्य पार पडल्याबद्दल समाधान त्यांना नक्कीच मिळाले असेल.
अनुवादक
स. तारासिंह गोरोवाडा "जाचक"
मराठी संतसाहित्याचा सिख प्रचारक.

- वयाच्या ७० व्या वर्षी श्री गुरु ग्रंथ साहिब जी चे मराठीत भावानुवादची सुरुवात.
- मनस्वी समाजसेवक, खंदे शाहीर, भाषांतरकार आणि कवी. शायर, गीते सामाजिक समस्यांवर काव्य करणारे. पंजाबी, हिंदी आणि मराठी भाषांवर प्रभुत्व. शिक्षण नॉनमॅट्रिक.
- 'समाज भूषण पुरस्कार' पुणे महानगर पालिका पुणे, सन्मान मा. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भवानी तलवार देऊन सत्कार, काव्यलेखन, अनेक सन्मान.
देशाच्या फाळणीनंतर पाकिस्तानात समाविष्ट झालेलं, १४ जुलै १९३८ मध्ये जन्मलेले, मुळगाव कादरींबाद, पाकिस्तान, पुण्यावर आणि पुणेरीपणावर अति प्रेम करणारे पापाजी गेली अनेक वर्षे धनकावडीत पाणीवाले सरदारजी म्हणून प्रसिद्ध आहेत. तन-मन-धन समाजकार्यात वाहिलेलं तारासिंग धार्मिक कार्यात तितकेच तत्पर आहेत. स्वरचित काव्यांची झलक सादर करणारे तारसिह गोरोवाडा आपल्या सिख धर्मावरील भाष्य, तितितक्याच तडफेने समाजावर बिंबवतात. अगदी कठीण परिस्थितीतून सामना करीत त्यांनी आपला प्रपंच आज नावारूपाला आणला आहे. त्यात ते पूर्ण समाधानी आहेत. भूक आहे ती सामाजिक, धार्मिक कार्याची आणि अंगीभूत असल्येल्या काव्यप्रतिभेची.
केवळ शालेय शिक्षण झाले असून ही त्यांनी शहीद, आई, गुरुनानक, प्रेम, गुरु अशा विविध विषयांवर मुक्तछंदा मधील हिंदी रचना केलेल्या आहेत. त्यांनी व्यक्ती नुसार आणि प्रसंगानुसार हिंदी आणि मराठी मध्ये ४०० च्या आसपास शेर लिहिलेले आहेत. पापाजींची लिहिलेली अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.
श्री गुरु ग्रंथ साहिब मध्ये बाबा फरीद म्हणतात की,
फरीदा ए विसु गंदला धरी आं खंडु लिवाडी |
इकि राहेदे रहि गए इकि राधी गए उजाडि || (श्री.गु.ग्रं.सा.१३७९)
फरिदजी सांगतात, ह्या संसारात भौतिक सुखे ही साखरेत घोळलेले विष आहेत. भौतिक सुखे वरकरणी गोड वाटली तरी परिणामी ती जीवाला प्रभुभक्ती पासून दूर नेतात. पण काही लोक त्यातच रमून अखेर मारून जातात. काही लोक मात्र असे असतात, की जे हे ओळखून ह्या भौतिक सुखांचा त्याग करून प्रभू परमात्म्यची भक्ती करुन शाश्वत अशा आत्मिक सुखाची प्राप्ती करून घेतात. ।।३७।।
फरीदा चारि गवाइआ हंढि कै गवाइआ संमि |
लेखा रबु मंगेसीआ तु आंहो केहें कंमि || (श्री.गु.ग्रं.सा.१३७९)
फरिदजी सांगतात, हे जीवन चार दिवसाचे चार प्रहर तू प्रपंचासाठी धावपळ करण्यात घालवलेस तर रात्रीचे चार प्रहर झोपण्यात घालवलेस. प्रभू परमात्मा जेव्हा तुला तुझ्या कृतकर्मांचा हिशोब मागेल, तेव्हा विचारेल की तुला जगात कोणत्या कामासाठी पाठवले होते, व तू काय काम केलेस ? तेव्हा तू काय उत्तर देशील ? ।।३८।।